ताज्याघडामोडी

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल; 1960 नंतर पहिल्यांदाच रचना बदलली

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेला आकडेवारीसह सविस्तर उत्तर दिले. मागील वर्षभरात राज्यातील गुन्ह्यात घट झाली आहे. मुस्कानसारख्या योजनेची केंद्र सरकारनेही प्रशंसा केली असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांची पाठही थोपटली आहे.

1960 नंतर पहिल्यांदाच पोलीस दलाची रचना बदलली आहे. नवीन आकृतीबंध व नियमावली तयार केली आहे. याप्रमाणे शहरी भागात दोन पोलीस स्टेशनमधील अंतर हे चार किलोमीटर, तर ग्रामीण भागात दोन पोलीस स्टेशनमधील अंतर हे दहा किलोमीटर असणार आहे. आपण डिजिटल केस डायरी आणणार आहोत – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आकड्यांवर ठरते. यामध्ये सेफ्टी परफेक्शन महत्त्वाचे असते. सध्याच्या घडीला मुंबईत महिला अतिशय सुरक्षित आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. देशात दोन नंबरची लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे. एक लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती अशा पद्धतीची गणना केली जाते. या पद्धतीने महाराष्ट्र देशात दहावा आहे. मागच्या वर्षी 5493 गुन्ह्यांची घट झाल्याचेही फडणवीस म्हणाले.

महिला व बालकांवर होणारे अत्याचार यामध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. तर आसाम पहिल्या क्रमांकावर आहे. लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र सतरावा आहे. महिला, मुली गायब होतात त्याला अनेक कारणे आहेत. 2021 पर्यंत पाहिले तर गायब झालेल्या महिला पुन्हा येण्याचे प्रमाण हे 87 टक्के आहे. 2022 चा विचार केला तर ते प्रमाण 80 टक्के आहे. चालू वर्षी 2023 जानेवारी ते मे यामध्ये ज्या घटना घडल्या त्यात 63 टक्के महिला पुन्हा परत आलेल्या आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *