पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि एमबीए या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयआरपी-पेटेंट, डिझाईन, ट्रेडमार्क आणि कॉपी राईट’ या विषयावर दि.१७ जुलै ते २२ जुलै २०२३ दरम्यान एक आठवड्याचा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला.
दीप प्रज्वलनानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी प्रास्ताविकात या आठवडाभर चालणाऱ्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आयोजनाचा हेतू व संशोधनासाठी असलेली अशा प्रोग्रामची आवश्यकता याबाबत सविस्तर माहिती दिली. या उपक्रमात बौद्धिक क्षेत्राशी संबंधित विविध विषयांचा समावेश होता. या अभ्यासपूर्ण सत्रात अधिकार, कायदा, संस्था, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांना आमंत्रित केले होते. सर्वांचे स्वागत करून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे प्राध्यापक हे अद्ययावत असणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी अशा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांची अत्यंत गरज असते तसेच शिक्षणात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर अधिक भर दिल्यास विद्यार्थ्यांचा बौद्धिक व व्यक्तीमत्वाचा विकास अधिक गतीने होऊ शकतो.’ उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नाशिकच्या के.के.वाघ, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग रिसर्चचे डॉ.प्रशांत कुशारे म्हणाले की, ‘जागरूक आणि उत्सुक राहून आपल्या सभोवतालचे जग बारकाईने पाहिले तर रोजच्या अनुभवांमुळे नाविन्यपूर्ण कल्पना येऊ शकतात.’ दुसरे सत्र गुंफताना एसीआयसी एमआयईटी मेरठ फाउंडेशन, मेरठ, आणि उत्तर प्रदेशचे कार्यकारी अधिकारी डॉ.शाश्वत पाठक यांनी ‘कॉपीराइट’ या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सचे गिरीश संपथ यांनी ‘ट्रेडमार्क’ विषयी माहिती दिली. त्यानंतरच्या सत्रात स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी उत्पादन डिझाइन, सेवा यासाठी प्रक्रिया कोणती आहे याची संपूर्ण माहिती दिली. डिझाइन, वापरकर्ता अनुभव (युएक्स) आणि वापरकर्ता इंटरफेस (युआय) डिझाइन, व्यवसाय इनोव्हेशन, एज्युकेशन सोशल इनोव्हेशन, हेल्थकेअर, अर्बन प्लॅनिंग, डिझायनर्सच्या गरजा, प्राधान्ये आणि सखोल माहिती समजून घेण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर ब्राइट स्टार इलेक्ट्रॉनिक्स, पुणेचे संचालक डॉ.पद्माकर केळकर यांनी बौद्धिकांच्या विहंग अवलोकनाबद्दल अंतर्दृष्टी दिली तसेच ऐतिहासिक विकास आणि आयपीआरचे महत्त्व, मालमत्ता अधिकार, नवकल्पना आणि सर्जनशीलता वाढवणे यावर भाष्य केले. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ एन. डी. मिसाळ यांनी पेटंटबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पेटेंटीज आयपी सर्व्हिसेस, सोलापूरचे संचालक प्रा.सिद्रामप्पा धरणे यांनी ‘पेटंट कसे शोधायचे, रजिस्टर कसे करावे, त्याच्या नोंदी कुठे आणि केव्हा कराव्या, त्याचे कोणकोणते अधिकार असतात? याविषयी माहिती दिली. चौथ्या दिवशीचे दुसरे सत्र स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.प्रदीप जाधव यांनी पेटंटसाठी आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील प्रकल्प, त्याच्यासाठी प्रत्येक कल्पना कल्पनेचे महत्त्व तसेच प्रकल्प किंवा पेटंट तयार करणे याविषयी माहिती दिली. पाचव्या दिवसाचे पहिले सत्र वरिष्ठ आयपी असोसिएट, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुण्याच्या श्रीमती सुप्रिया गांधले यांनी ‘भारतीय पेटंट आणि ट्रेडमार्क एजंट’ या विषयावर बोलताना पेटंट आणि ट्रेडमार्क यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. पाचव्या दिवसाचे दुसरे सत्र स्वेरीच्या प्लेसमेंट विभागाचे प्रा.सचिन खोमणे यांनी हँड्स-ऑन व डिजिटल स्वाक्षरी कशी तयार करू शकतो, डिजिटल स्वाक्षरीचा भविष्यात काय उपयोग आहे? पेटंट भरण्याची प्रक्रिया आदी विषयांवर मार्गदर्शन केले. सहाव्या दिवसाच्या सत्रात पॅटलेक्स बिझनेस सोल्युशन्स आणि फार्मा लिटरेटी, मुंबईचे संचालक प्रा.विजयकुमार शिवपुजे यांनी पेटंटसंबंधी सर्व मूलभूत गोष्टी तसेच पेटंट दाखल करण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत आणि पेटंटची नाविन्यता काय आहे तसेच आपले पेटंट का नाकारले जाते याविषयी माहिती दिली.आठवडाभर चाललेल्या या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये अनेक संशोधक, प्राध्यापक व तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर आयआयसी समन्वयक डॉ.विद्याराणी क्षीरसागर, प्रा. अतुल पाटील, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, एमबीएचे विभागप्रमुख व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील व इतर विभागातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.नीता कुलकर्णी व डॉ. निखीलेशकुमार मिश्रा यांनी काम पहिले. सूत्रसंचालन प्रा.एस.एस.जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी मानले.