उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये प्रेम प्रकरणातून एका भावानं धारदार शस्त्रानं त्याच्या बहिणीचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी बहिणीचं शिर हातात धरुन गावभर फिरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपी भावाला अटक केली. त्याच्या हातात तेव्हादेखील कापलेलं शिर होतं. घटनेमुळे पूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोपीला शिर हातात धरुन चालताना पाहणाऱ्या अनेकांचा अक्षरश: थरकाप उडाला.
आशिफा नावाच्या तरुणीचे गावात राहणाऱ्या चांद बाबूशी प्रेमसंबंध होते. २९ मे रोजी ती प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर पोलिसांनी चांद बाबू विरोधात गु्न्हा दाखल केला आणि त्याची रवानगी तुरुंगात केली. शुक्रवारी याच मुद्द्यावरुन भाऊ-बहिणीचा वाद झाला. भांडण वाढत गेलं. संतापलेल्या रियाजनं बहीण आशिफाचा गळा कापून निर्घृण हत्या केली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी रियाजचा त्याची बहीण आशिफासोबत वाद झाला. त्यानंतर तो घरातून निघून गेला. थोड्या वेळानंतर तो घरी परतला. त्यानं आशिफाला कपडे धुण्यास सांगितले. आशिफा पाणी भरु लागली. तितक्यात रियाज मागून आला आणि तिच्यावर सुऱ्यानं सपासप वार केले. आशिफाचं शिर धडापासून वेगळं होईपर्यंत त्यानं वार सुरुच ठेवले.
आशिफाची हत्या केल्यानंतर रियाज तिचं शिर हातात घेऊन घरातून बाहेर पडला. हातात मुंडकं घेऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या रियाजला पाहून अनेकांचा थरकाप उडाला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं पोहोचून त्याला अटक केली. ‘एका भावानं बहिणीची हत्या केली आहे. त्याला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे,’ असं अपर पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी सांगितलं.