अभियंता पतीने केला चाकूने सपासप वार करून खून
आयटी इंजिनिअर पत्नी पगाराचे पैसे देत नसल्याने तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अभियंता पतीने चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पतीस हडपसर पोलिसांनी अटक केली. गर्भवती राहिल्यानंतर सात महिने माहेरी राहून संबंधित पत्नी रविवारी रात्रीच सासरी पतीकडे आली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पतीशी कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून पतीने तिची निर्घृण हत्या केली. दरम्यान, सात महिन्यांची चिमुकली ही पोरकी झाली आहे.
ज्योती राजेंद्र गायकवाड (२८, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर, पुणे, मु. रा. शेळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती राजेंद्र भाऊराव गायकवाड (३२, मूळ. रा. मंडगी, देगलूर, नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. दोघांचे लग्न नोव्हेंबर २०२० मध्ये झाले होते. याबाबत मृताची बहीण गंगासागर बालाजी क्षीरसागर (३३) यांनी आरोपी राजेंद्र गायकवाड आणि सुनील गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.
सकाळी वाद झाल्याने केले चाकूने वार गायकवाड खासगी कंपनीत अभियंता आहे. तो चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा छळ करत होता. सोमवारी सकाळी त्यांच्यात वाद झाले. त्याने चाकूने ज्योतीवर वार केले.