ताज्याघडामोडी

‘आत्महत्येची परवानगी द्या…’ पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येसाठी परवानगी मागितल्याचा खळबळजनक प्रकार गोराई पोलीस ठाण्यात घडला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस पतीचा मानसिक छळ होत असल्याने आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी या पत्रामध्ये केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस शिपाई योगेश खेडेकर हे गोराई पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी मिनाक्षी खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येसाठी परवानगी मागितली आहे. गोराई पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी नवऱ्याच्या खोटया तक्रारी व रिपोर्ट बनवून अडचणीत आणत असून मानसिक छळ करत असल्याचे पोलिस पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.

तसेच वरिष्ठ पोलिसांकडे दाद मागून, पुरावे देऊनही त्या अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात असल्याचा आरोपही मिनाक्षी खेडेकर यांनी केला आहे. त्यामुळेच रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून मिनाक्षी खेडेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उद्देशून ट्विट करत आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

“नमस्कार साहेब मी एक पोलीस पत्नी आहे. गोराई पोलीस ठाणे मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदाकिनी नरोटे यांचेकडून आम्हाला खूप मानसिक त्रास दिला जात आहे. आपणच आम्हाला न्याय देऊ शकता साहेब. अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी…” असे ट्वीट मिनाक्षी खेडेकर यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *