गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आजारी पतीच्या उपचारासाठी पडेल ते काम केलं, पण चारित्र्यावर संशय असलेल्या नवऱ्याने तिलाच संपवलं

पतीच्या उपचारासाठी पैसे जमवण्याचे काम करत असताना स्वत:च्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नागपुरातील नंदनवन झोपडपट्टी येथे घडली आहे. अर्चना रमेश भारस्कर (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा दाम्पत्याच्या मुलीही घरी होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती रमेश भारस्कर हा नंदनवन गली १२ येथील रहिवासी असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आरोपीचे हे दुसरं लग्न होते. तो पहिल्या पत्नीचाही चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे आरोपीच्या पहिल्या पत्नीनेही लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याला सोडून दिले होते. स्वतःच्या वडिलांच्या संबंधामुळे तो तिच्यावर संशय घेत असे. पहिल्या पत्नीने सोडून गेल्यानंतरही आरोपी रमेश भारस्कर हा सुधारला नाही.

मृतक अर्चना रमेश भारस्कर या दुसऱ्या पत्नीवरही संशय घेत असे. त्यामुळे मृतक तिच्या दोन मुलींसह अमरावती येथे तिच्या आईच्या घरी मागील ६ वर्षांपासून राहत होती. मागील अनेक दिवसांपासून आरोपी रमेशची प्रकृती खालावली होती. याची माहिती मिळताच आरोपीची पत्नी आपल्या दोन मुलींसह आरोपीला सांभाळण्यासाठी परतली. आरोपी हा मासे विकण्याचे काम करायचा. मात्र त्याच्या उपचारासाठी ही महिला मिळेल ते काम करून पैसे गोळा करत असे. मात्र यावरही आरोपी पत्नीवर संशय घेत असे. सोमवारी रात्री महिला कामावरून परतली. आपल्या मुलीसह घराशेजारी राहणाऱ्या भावाच्या घरी गेली. तेथून ती मध्यरात्री बारा वाजता घरी परतली.

दरम्यान, संशयावरून रमेशचा पत्नीशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की, आरोपीने महिलेचा जवळच ठेवलेल्या हातोड्याने वार करून खून केला. रात्रभर महिलेच्या मृतदेहाजवळ राहून पहाटे ५ वाजता घराचे दार बंद करून बहार चौकात गेला. त्यानंतर आपल्या आत्याला फोन करून घटनेची माहिती दिली. घाबरलेल्या आरोपीच्या आत्याने आरोपीच्या लहान भावाला फोन करून सांगितले. हे ऐकताच आरोपीचा भाऊ घरी पोहोचला. तेव्हा त्याची वहिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. याची महिती पोलिसांना देण्यात आली. नंदनवन पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *