ताज्याघडामोडी

वीज दिवसा स्वस्त, रात्री महाग; नवा नियम आणण्याच्या तयारीत मोदी सरकार

केंद्र सरकार विजेच्या दरात बदल करण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे. येत्या काही दिवसांत विजेचे दर बदलतील. दिवसा विजेच्या दरात २० टक्क्यांची कपात करण्यात येईल. तर रात्री विजेचे दर २० टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती वीज मंत्रालयानं दिली आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास ठराविक तासांमध्ये विजेचा वापर अधिक होतो. या वेळेत होणारी कामं दिवसभरात केल्यास विजबिलात २० टक्के बचत करता येईल. वीज मंत्रालय नवे नियम आणण्याच्या तयारीत आहे. नव्या नियमांनुसार, दिवसा वीज २० टक्क्यांनी स्वस्त मिळेल. तर विजेचा सर्वाधिक वापर होत असलेल्या कालावधीत (पीक अवर्स) विजेचा दर २० टक्के अधिक असेल.

विजेच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर सध्या सर्वाधिक वीज वापर होत असलेल्या तासांमध्ये ग्रीडवर कमी दबाव पडेल, अशी अपेक्षा आहे. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत विजेचा सर्वाधिक वापर होतो. सकाळी वॉशिंग मशीन, पाण्याची मोटर यासाठी वीज वापरली जाते. तर संध्याकाळी लोक कामावरुन परतल्यानंतर टीव्ही, एसीचा वापर करतात. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर अधिक असतो.

एप्रिल २०२४ पासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी नवे नियम लागू होतील. त्यानंतर एका वर्षानंतर कृषी क्षेत्राला सोडून बहुतांश ग्राहकांसाठी नियम लागू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *