ताज्याघडामोडी

भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी ताई निघाली, वाटेतच काळाचा घाला; बापाने डोळ्यांदेखत लाडक्या पोरीला गमावलं

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सर्वसाधारण कुटुंब. मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या भवितव्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बी.एस.सी द्वितीय वर्षाला शिक्षण घेणारी मुलगी आणि वडील दुचाकीने निघाले. मात्र, काळ त्यांची वाट पाहत होता. बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेजवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जबरदस्त धडक दिली.

या अपघातात मुलगी जागीच ठार, तर वडील गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनाला चटका लावणारी ही घटना काल गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

मृत विद्यार्थिनीचे नाव वेदांती युवराज चिंचोलकर (वय २१) असं आहे. गंभीर जखमी असलेल्या वडिलांचे नाव युवराज माधव चिंचोलकर असं आहे. वेदांती आणि तिचे वडील युवराज चिंचोलकर हे दुचाकी एमएच ३४ बीएन ५८४८ क्रमांकाच्या वाहनाने बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत कुणालच्या अकरावीच्या प्रवेशासाठी गेले. तेथील काम आटोपून राज्य महामार्गाने चंद्रपूरकडे वळले.

दरम्यान, कालरूपी अज्ञात चारचाकी वाहन आले. चारचाकी वाहनाच्या चालकाच्या निर्दयीपणामुळे दुचाकीला जबरदस्त धडक बसली. अपघातात वेदांती आणि वडील रस्त्यावर कोसळले. दुचाकी फरफटत काही अंतरावर गेली. अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून वेदांती आणि तिच्या वडिलांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र, रुग्णालयात वेदांती हिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वेदांती चिंचोलकर ही हुशार आणि मनमिळावू स्वभवाची होती. ती चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बी.एस.सी द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. भाऊ कुणालाचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून ती वडिलांसोबत त्याचा प्रवेश घेण्यासाठी गेली. मात्र, ती पुन्ही घरी न येण्यासाठी. तिच्या अपघाती निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *