एका महिलेनं तिच्या चार मुलांची हत्या करुन आत्महत्या केली आहे. चार मुलांना अन्नधान्याच्या ड्रममध्ये बंद केल्यानंतर महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली. ती गर्भवती होती. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली.
शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बानियावास गावात राहणाऱ्या उर्मिलानं (२७) तिच्या चारही मुलांना धान्याच्या ड्रममध्ये बंद केलं. मुलांना ड्रममध्ये ठेवल्यानंतर तिनं वरुन झाकण लावलं. श्वास कोंडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. भावना (८), विक्रम (५), विमला (३) आणि मनिषा (३) अशी त्यांची नावं आहेत. घटना घडली तेव्हा उर्मिलाचा पती जेठाराम मजुरीसाठी जोधपूरमधील बालेसरला गेला होता.
आम्ही वेगवेगळे राहतो. आमची घरं दूर दूर आहेत, असं उर्मिलाचे नातेवाईक असलेल्या मांगीलाल यांनी सांगितलं. ‘शनिवारी सकाळी उर्मिलाचा पती जेठाराम मजुरीसाठी गेला. संध्याकाळच्या सुमारास आम्ही शेतात काम करत होतो. त्यावेळी उर्मिला आणि मुलं दिसली नाहीत. त्यामुळे घरातील महिलांनी तिला आवाज दिला. पण बराच वेळ होऊनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलांनी उर्मिलाच्या घरी जाऊन पाहिलं. उर्मिलानं गळफास घेतला होता. मुलांचा शोध घेतला असता ती ड्रमच्या आत सापडली. श्वास कोंडला गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. पती-पत्नीमध्ये काय घडलं, याची कल्पना आम्हाला नाही,’ असं मांगीराम म्हणाले.
उर्मिलानं सकाळी पतीला नाश्ता दिला. त्यानंतर डबा भरुन दिला. संध्याकाळी पाच वाजता त्याला फोन केला होता. वडिलांची प्रकृती बिघडली असून लवकर घरी या, असं सांगितलं होतं, अशी माहिती जेठारामचे भावजी प्रदीप यांनी दिली. या घटनेप्रकरणी उर्मिलाचे काका डुंगरराम यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. ‘माझ्या पुतणीला तिच्या सासरची मंडळी गेल्या ५ वर्षांपासून त्रास देत होती. उर्मिलानं अनेकदा याबद्दल तिची व्यथा मांडली होती,’ असं डुंगरराम यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. जावयानंच उर्मिला आणि मुलांची हत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणी योग्य कारवाई करुन पोलिसांनी आमच्या पुतणीला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.