उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनं तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. लखीमपूर खिरीतील चमरुआ गावात १ जूनला एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसीनंच प्रियकराची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
लखीमपूर खिरीतील चमरुआ गावात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणाची हत्या गळा दाबून करण्यात आल्याचं तपासातून उघडकीस आलं. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मृत तरुणाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला अटक केली.
चमरुआचा रहिवासी असलेला अमित त्याच्या प्रेयसीसोबत ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. तो अंबालामध्ये नोकरी करायचा. ३० मे रोजीच तो अंबालाहून गावाला परतला होता. त्यावेळी त्याची प्रेयसी रिंकीदेखील त्याच्या सोबत होती. घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच रिंकीनं अमितची हत्या केली.
अमित आणि रिंकूनं ३ वर्षांपूर्वी घर सोडलं होतं. दोघे लग्न न करताच सोबत राहायचे. मात्र जसजसे महिने जाऊ लागले, तसतसे त्यांच्यात वाद सुरू होऊ लागले. अमित आणि रिंकी यांच्यात चार दिवसांपू्र्वीच झालेला वाद मारहाणीपर्यंत गेला होता, असं अमितचे वडील रामचंद्र यांनी सांगितलं.
रिंकी अंबालात असताना राममिलन नावाच्या तरुणाशी गुपचूप फोनवर बोलायची. अमितनं तिला हटकलं. मात्र रिंकीनं ऐकलं नाही. तिनं राममिलनच्या मदतीनं अमितला मारहाण केली. याबद्दल समजताच अमित आणि राममिलनला मालकानं कामावरुन काढलं. त्यामुळे अमित घरी परतला होता. तिथे रिंकीनं गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह घराच्या मागे असलेल्या शेतात फेकला.