बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे यांनी टिप्पर चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तब्बल 3 किलोमीटर सिनेस्टाईल हा थरार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसून आला.
सुदैवाने यात केवळ बॉडीगार्ड जखमी झाला. गाडी चालक आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या घटनेत बचावल्या आहेत. या प्रकारानंतर एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे.