ताज्याघडामोडी

मित्राला भेटायला गेला, भाजप आमदाराच्या पुत्रानं जीवन प्रवास संपवला; त्रासदायक मार्ग वापरला

झारखंडच्या धनबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मुलानं आत्महत्या केली आहे. त्यानं सल्फरच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवलं. मुलाच्या अकाली निधनानं आमदाराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पक्षानंदेखील याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाजप आमदाराला करोनाची लागण झाली होती. करोनातून बरे झाल्यानंतर त्यांना काही त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते हैदराबादमध्ये उपचार घेत आहेत.

धनबादमधील सिंदरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रजीत महतो यांचा मुलगा विवेक कुमार मित्राला भेटण्यासाठी घरातून निघाला होता. रांचीच्या ग्रामीण परिसरात असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मित्राच्या भेटीसाठी जात असल्याचं त्यानं घरी सांगितलं होतं.

रविवार-सोमवार दरम्यानच्या रात्री विवेकनं सल्फरच्या गोळ्या खाल्ल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्यानंतर त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला रांचीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. सल्फरच्या गोळ्या खाल्ल्यानं विवेकची प्रकृती बिघडली. रुग्णालयातील उपचारांचा त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही. सोमवारी सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला.

विवेकचे वडील आणि भाजप आमदार इंद्रजीत गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजारी आहेत. २०२१ मध्ये त्यांना करोनाची लागण झाली. तेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. पोस्ट करोना इफेक्टमुळे त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू आहेत.

विवेकच्या निधनाबद्दल भाजप ग्रामीण जिल्हा महामंत्री निताई रजवार यांनी शोक व्यक्त केला. ‘वडील प्रदीर्घ कालावधीपासून आजारी असल्याचं विवेक तणावाखाली होता. यासोबतच अभ्यासाचाही ताण त्याच्यावर होता. काही दिवसांपूर्वीच त्यानं दिल्लीत बीटेकची परीक्षा दिली आणि त्यानंतर तो रांचीला आला होता,’ असं रजवार यांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच भाजपचे आमदार समरीलाल आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार मथुरा प्रसाद महतो यांनी रिम्समध्ये धाव घेतली. त्यांनी शवविच्छेदनगृहात जाऊन अधिक माहिती घेतली. बाबुलाल मरांडी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. आमच्या सहवेदना विवेकच्या कुटुंबासोबत असल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *