ताज्याघडामोडी

जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, ‘या’ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये जयंत पाटील यांना २२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. गेल्याच आठवड्यात जयंत पाटील यांना ईडीने पहिल्यांदा समन्स बजावले होते. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे जयंत पाटील यांनी चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडे आणखी वेळ मागून घेतला होता. त्यानंतर आता ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले असून २२ मे रोजी त्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी होईल.

ईडीने जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. जयंत पाटील यांना ईडी नोटीस पाठवण्याच्या टायमिंगची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. आता २२ मे रोजी होणाऱ्या चौकशीत काय निष्पन्न होणार आणि जयंत पाटील यांच्याविरोधात ईडी काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहिल्यांदा ईडीची नोटीस आल्यानंतर जयंत पाटील यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘काल माझा लग्नाचा वाढदिवस होता. त्यात ईडीने मला नोटीस पाठवली, संध्याकाळी ५ वाजता सही झाली आणि ६ वाजता नोटीस माझ्या घरी आली. पण त्या नोटिशीमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्यातल्या काही फाईल नंबर काढून बघितल्या तर, असं दिसतंय की आयएलएफएस नावाची कुठली संस्था आहे आणि त्याच्याशी माझा आयुष्यात काही संबध आला नाही. कधी आयएलएफएसचं कर्ज घेतलं नाही, त्यांच्या दारात मी कधी गेलो नाही. कधी कुणाशी बोललो नाही.

त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तरी आता बोलावलंय म्हटल्यावर कालच एका हवालदाराने ६ वाजता माझ्याकडे येऊन ही नोटीस मला दिली. आता त्यांची जी काही चौकशी असेल, त्याला सामोरे जाऊ. पण आता दोन ते तीन दिवस लग्नसराई आहे. घरातल्या जवळच्यांची लग्न पण आहेत. त्यामुळे ईडीकडे वेळ मागणारं पत्र मी आज पाठवून देईन’, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *