पैशांसाठी एका 17 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या बंगावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला पकडलं असून त्याच्याकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे.
गोंदियाच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बंगावातील 17 वर्षीय चेतन खोब्रागडे या मुलाची हत्या झाली. या प्रकरणात आरोपीला अटक झाली असून 10 लाखाच्या खंडणीसाठी गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीने चेतनची शेत शिवारात गळा आवळून हत्या केली. त्यानंतर चेतनचा मृतदेह कोणाच्याही हाती लागू नये म्हणून तनसीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता.
चेतन हा काल दुपारी आमगाव शहराला लागून असलेल्या रिसामा गावातील आपल्या मोठ्या आईकडे जाण्यासाठी निघाला होता मात्र, संध्याकाळ झाली तरी पोहचला नसल्याने घराच्या लोकांनी शोधा-शोध केली.
त्यानंतर कुटुंबीयांकडून चेतनच्या मिसिंग झाल्याची तक्रार पोलिसामध्ये देण्यात आली. याच दरम्यान आरोपीने चेतनच्या कुटुंबीयांना फोनवर कॉल करीत पैशांची मागणी केली होती. याच नंबरच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशच्या नवेगाव खैरलांजी गावातील 24 वर्षीय दुर्गाप्रसाद हरिणखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपी दुर्गाप्रसाद हरिणखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी आरोपीने आमगाव शहराला लागून असलेल्या शेत शिवारात चेतनचा मृतदेह लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. तसेच पैशांसाठी आपण हे कृत्य केल्याचंही त्याने कबूल केलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना करिता पाठिविले असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.