राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार अशा अनेक प्रकारचय्या गुन्ह्यांच ग्रामीण भागात देखील लोण वाढत आहे. याचदरम्यान, पैशांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने मुला मुली समोर त्यांच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना जयभीम नगर टाऊन हॉल येथील पॅंथर भवन समोर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कैलास वाकेकर (वय ४७, रा.जयभीम नगर टाऊन हॉल) असं मयताचं नाव असून अजय चव्हाण (वय २५, रा. पेठे नगर भावासिंगपुरा) असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा मोलमजुरी करतो. मयत कैलास हा सामाजिक कार्यकर्ता होता. दरम्यान, कैलास याचा मुलगा जयेश आणि अजय हे मित्र आहेत. मयत कैलास आणि आरोपी अजय यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी टाऊन हॉल परिसरामध्ये वाद झाला होता.
अजय हा माजी नगरसेवक संजय जगताप यांच्या पँथर भवन या कार्यालयाजवळ होता. यावेळी कैलास हा दुचाकी क्र.एमएच २० डीबी २९७३ यावरुन टाऊन हॉल येथील पॅंथर भवन या ठिकाणी आला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ही बाब जयेश आणि तिच्या बहिणीच्या लक्षात येताच दे दोघे तेथे धावत आले. अजय हा चिकन शॉपमध्ये गेला आणि दुकान चालकाकडून चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने कैलासच्या पाठत त्या चाकूने वार केले. यामध्ये कैलास हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. दरम्यान, कैलास याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेत आरोपी देखील जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.