ताज्याघडामोडी

सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देण्याची शक्यता; सरन्यायाधीशांकडून संकेत

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवर उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. कारण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आम्ही उद्या दोन प्रकरणांवरील निकाल देणार आहोत, असं सांगितलं आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी उल्लेख केलेल्या दोन प्रकरणांमधील एक प्रकरण हे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यात मागील वर्षी जून महिन्यात अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह केलेल्या बंडामुळे ठाकरे यांचं सरकार कोसळून नवं सरकार अस्तित्वात आलं होतं. मात्र शिवसेनेतील फूट आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकेचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलं. या प्रकरणात अनेक महिने सुनावणी झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

‘सुप्रीम कोर्टात उद्या जर निकाल येणार असेल, तर तो साधारण सकाळी ११ वाजताच्या सुमारास येईल. निकाल ज्यांनी लिहिलाय, ते एकच न्यायमूर्ती तो निकाल वाचून दाखवतील. त्याील ऑपरेटिव्ह पार्ट न्यायमूर्ती वाचून दाखवतात. त्यावर नंतर सगळे न्यायमूर्ती सह्या करतात आणि त्यात दुमत असेल, तर ते न्यायमूर्तीही त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट वाचतात,’ अशी माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *