ताज्याघडामोडी

दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये उच्चशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं

उच्चशिक्षित असलेल्या औषध डिस्ट्रीब्यूटरने ज्युसमध्ये विषारी औषध प्राशन करून मेडिकलमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आली आहे. आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय राहुल मोहन पाराशर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो यादव नगर एन ११ हडको या परिसरात राहत होता. राहुल हा उच्च शिक्षित असून गेल्या काही दिवसांपासून तो छत्रपती संभाजीनगर येथे औषध डिस्ट्रीब्यूटर म्हणून काम करत होता. त्याचं नागेश्वरवाडी या भागामध्ये तनिषा नावाचं दुकान होतं. त्याच्याकडे चार माणसं कामासाठीही होती. या ठिकाणाहून तो शहरातील औषध विक्रेत्यांना औषध पुरवत होता.

पाच वर्षांपूर्वी राहुलचा विवाह झाला होता. पत्नी गृहिणी असून त्यांना साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान शुक्रवारी राहुल कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर पडला. त्यानंतर दुपारच्या दरम्यान तो त्याच्या दुकानात आला. दुपारच्या सुमारास त्याने दुकानात असताना ज्युसमध्ये उंदीर मारणाचं अल्युमिनियम फॉस्फेट हे औषध टाकून ते ज्युसमधून प्राशन केलं.

अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर त्याने घाटीत काम करणाऱ्या मित्राला फोन करून माहिती दिली. त्यानंतर मित्राने त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र घाटी रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने त्याला खाजगी दवाखान्यात दाखल केलं गेलं. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *