महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु, रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता. परंतु, या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.
महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा, म्हणून सर्वांना फोन करत होती. अजित पवार साहेब आधी आपलं बघा, नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला फोन केले आणि निरोप दिले ते सांगा. आधी याची कल्पना लोकांना द्या, नंतर आमच्यावर टीका करा, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले. नरेश म्हस्के यांच्या या आरोपांना आता राष्ट्रवादीच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल. तसेच रोहित पवार आणि अजित पवार या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनची निवडणूक झाली होती. संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. एकूण २४ मतदारांपैकी पवार यांना २२, तर सुनील संपतलाल मुथा यांना २१ मते पडली होती. तर शरद पवारांचे दुसरे नातू अभिषेक बोके यांना तीन, तर शंतनू सुगवेकर यांना अवघ्या दोन मतांवर समाधान मानावे लागले होते.