ताज्याघडामोडी

समन्स बजावायला जाताना काळाची झडप, ३२ वर्षीय पोलिसाचा ऑन ड्युटी मृत्यू, गरोदर पत्नीला धक्का

भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील तरुण पोलीस कर्मचार्‍याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सागर दिलीप देहाडे (वय ३२ वर्ष, वाघ नगर, जळगाव) असे मयत पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या घटनेने पोलीस दल सुन्न झाले असून आज दिवसभर जिल्हा पोलिस दलात याच घटनेची चर्चा होती.

जळगाव शहरातील वाघ नगर येथे पोलीस कर्मचारी सागर देहाडे हे कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांची गेल्या काही दिवसापासून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यानुसार नेहमीप्रमाणे सागर हे बुधवारी सकाळी ड्युटीवर गेले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजेरी लावली व समन्स बजावणीसाठी निघाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने ही बाब त्यांनी सहकार्‍याला सांगितली. त्यांना सहकारी कर्मचाऱ्यांनी भुसावळ शहरातील ट्रामा केअर सेंटरला नेण्यात आले येथे त्याचा डॉ. मयूर चौधरी यांनी ईसीजी काढला .

मात्र हृदयविकाराचा तीव्र तसेच गंभीर झटका असल्याने पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजमध्ये हलवत असतानाच वाटेतच सागर याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सागर यांच्या पश्चात आई उषाबाई, वडील दिलीप हरी देहाडे, लहान भाऊ नितेश, विवाहित मोठी बहीण, पत्नी रिश्णा, 4 वर्षांचा मुलगा अयांश असा परिवार आहे. सागर याचे वडील हमाली काम करतात. असे असताना जिद्दीने सागर हा २०११ मध्ये मुंबई येथे पोलीस दलात भरती झाला होता. त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाले, प्रशिक्षणानंतरचा नियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सागर याची जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती.

२०१८ मध्ये सागर याचे लग्न झाले. २०२० मध्ये त्याने स्वतःच्या हिमतीवर वाघ नगर येथे नवीन घर घेतले होते. सागर याची पत्नी चार ते पाच महिन्यांची गरोदर आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना काळाने सागर याच्यावर झडप घातली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *