ताज्याघडामोडी

सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबत सहकार विभागाने आदेश प्रसृत केले आहेत.ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरू आहेत. तसेच अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मतदारांच्या सहभागासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे सहकार विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे.

राज्यातील अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यापासून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र, वर्ग क, ड आणि वर्ग इ तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत. पुढील आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७०५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या ग्रामपंचायतीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानेही ७१४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्यामध्ये अ-वर्गातील ३८, ब- वर्गातील ११७०, क-वर्गातील ३१५१ आणि ड-वर्गातील २७८८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *