ताज्याघडामोडी

केमिकलयुक्त आंबा होणार हद्दपार, एफएसएसआयचा कारवाईचा इशारा!

उन्हाळ्याची चाहुल लागताच सर्वांना आठवतो तो आंबा. पण आता आंब्याची अस्सल चव रासायनिक खतांच्या माऱ्यात हरवली आहे. यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय) महत्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे यापुढे ग्राहकांना अस्सल आंबा मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री वाढली आहे. केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांना नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांसारखी चव नसते. हीच बाब लक्षात घेत आणि ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेत एफएसएसआयने हे पाऊल उचलले आहे.

एफएसएसआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी घातली आहे. कॅल्शियम कार्बाइड घातक वायू उत्सर्जित करते, ज्यामुळे अशा पिकवलेल्या आंब्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

एफएसएसआयने कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर किंवा विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना राज्यांना तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानंतरही याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या कडक इशाऱ्यासह एफएसएसआयने आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीदेखील काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये आंबा किंवा इतर फळे खऱेदी करताना खात्री असणाऱ्या ठिकाणांवरूनच फळांची खरेदी करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोणतेही फळ खाण्यापूर्वी ते चांगले धूण्यासचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *