अलीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू लागल आहे. अशीच एक दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात घडली आहे. महाड तालुक्यात वरंध इथे एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. आज शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. संतोष ज्ञानेश्वर मेमाणे रा. वरंध तालुका महाड, मूळ रा. सासवड, जिल्हा पुणे असे या शिक्षकाचे नाव आहे.
महाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षकाने वरंध येथील राहत्या घरामध्ये छताच्या फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षकांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून जीवन संपवण्याचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. मयत संतोष मेमाणे हे रायगड जिल्हा परिषद शाळा भावे चौधरीवाडी इथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी कर्जाला कंटाळल्यामुळे एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिक्षकाचा मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे इथे या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. गोरेगावकर हे करीत आहेत.