ताज्याघडामोडी

भाजप कार्यकर्त्यावरील हल्ला: राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नीवरही गुन्हा दाखल

माजलगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काल प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शेजुळ हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर माजलगाव येथील प्राथमिक उपचार रुग्णालयात करून नंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूतगिरणीत होत असलेल्या गैरप्रकाराविषयी तक्रार केली असल्यानेच माझ्यावर हल्ला झाला आहे, असा आरोप करत शेजुळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सदर प्रकरणाची दखल घेत आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि रामेश्वर तवानी यांच्यासह सहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, काल सकाळी ११ वाजता अशोक शेजुळ यांच्यावर अज्ञात सहा जणांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात शेजुळ हे गंभीररित्या जखमी झाले. यावेळी शेजुळ यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय फॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर शेजुळ यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर थेट आरोप केला आहे. आमदार सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी मी दिल्या होत्या आणि याच कारणावरून माझ्यावर हा हल्ला झाल्याचं अशोक शेजुळ यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

अशोक शेजुल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी मंगला सोळंके आणि इतर सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सोळंके यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.दरम्यान, सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यानच राष्ट्रवादीच्या एका आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *