गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वकिलानं पत्नीला ११ वर्षे खोलीत डांबलं; कुटुंबासोबतचा संपर्क तोडला; अखेर…

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक महिला लग्नानंतर जवळपास ११ वर्षे एका खोलीत होती. तिच्या सासरच्यांनी तिला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. ३५ वर्षीय महिलेची अखेर सुटका झाली आहे. १ मार्चला पोलिसांनी तिला बंद खोलीतून बाहेर आणलं. वकील पती आणि सासरच्या लोकांनी महिलेला एखाद्या कैद्याप्रमाणे ठेवलं होतं. सुप्रिया असं महिलेचं नाव आहे.

सासरची मंडळी सुप्रियाला घराबाहेर जाऊ देत नसल्यानं तिच्या माहेरच्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर सुप्रिया यांची खोलीतून सुटका झाली. अनंतपूर जिल्ह्यात जन्मलेल्या साई सुप्रिया यांचा विवाह २००८ मध्ये गोदावरीतील मधुसूदन यांच्याशी झाला. या दाम्पत्यानं बंगळुरूतील आयटी क्षेत्रात काम केलं आहे. त्यांना पहिलं मूल बंगळुरूमध्ये असताना झालं. यानंतर जोडपं विजयनगरमला आलं. इथे मधुसूदननं २०११ मध्ये कायद्याचा अभ्यास सुरू केला.

बंगळुरूतून विजयनगरमला येताच सुप्रियाचं आयुष्य जणू काही नरक बनलं. मधुसूदन आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला घरात कैद केलं. तिला तिच्या आई वडिलांशीदेखील बोलू दिलं जात नव्हतं. सुप्रिया आणि मधुसूदनला दोन मुलं आहेत. मात्र मधुसूदन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नातू-नातीला भेटू दिलं नाही. २०११ मध्ये विजयनगरमला आल्यानंतर सुप्रिया अगदी मोजक्या वेळी सासरच्या घरातून बाहेर गेल्या.

सुप्रिया यांना होत असलेला त्रास त्यांच्या आई वडिलांना माहीत होता. मात्र बराच वेळ ते शांत राहिले. आपण काही बोललो, पोलिसात गेलो, तर सासरची माणसं लेकीला आणखी त्रास देतील, या विचारानं सुप्रियाचे आई वडील गप्प राहिले. फेब्रुवारीत सुप्रियाचे आई वडील आणि काही नातेवाईक तिला भेटण्यासाठी विजयनगरमला गेले. मात्र मधुसूदननं त्यांची भेट होऊ दिली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला.

धक्कादायक बाब म्हणजे सुप्रियाच्या सासरच्या लोकांनी पोलिसांनादेखील घरात प्रवेश करू दिला नाही. त्यांनी सर्च वॉरंटची मागणी केली. यानंतर सुप्रियाच्या आई वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं वॉरंट जारी केलं. त्यानंतर मधुसूदनच्या घराची झडती घेण्यात आली आणि सुप्रियाची सुटका झाली. सुप्रियाचा पती आणि तिच्या सासरच्या लोकांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *