शेतीकामात मामाला मदत म्हणून बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कालव्यात पाय घसरुन बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे या गावात घडली आहे. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (वय २२ वर्ष, रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयुर हा दहावीपासून महिंदळे येथे असलेल्या त्याच्या मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता.
महिंदळे या गावात काही अंतरावर मयुरचे मामा देवासिंग नामदेव पाटील यांची शेती आहे. या शेताला लागूनच जामदा डावा कालवा आहे. घरी असल्यानंतर मयुर हा त्याच्या मामाला शेती कामात मदत करण्यासाठी शेतात जात जात होता, त्यानुसार मंगळवारी दुपारी मयुर हा मामासोबत गेला, मामा इतर कामात असल्याने मयुर बैलांना पाणी पाजण्यासाठी शेताजवळ असलेल्या कालव्यावर गेला.
या ठिकाणी बैलांना पाणी पाजत असताना, मयुरचा पाय घसरला व तो कालव्यात पडला, मयुरला पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो कालव्यात वाहत गेला. बराच वेळ झाला तरी मयुर परतला नाही, म्हणून मामासह इतरांनी शोध सुरु केल्यावर बैल सापडले, मात्र त्या ठिकाणी मयुर दिसला नाही.
मयुर कालव्यात पडला असावा या शंकेने कालव्याचे पाणी वाहत असलेल्या दिशेने जाऊन पाहिले असता, काही अंतरावर मयुर आढळून आला. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.







