धावपळीच्या जगात सोशल मीडियाने इतका धुमाकूळ घालून ठेवला आहे की इकडे तिकडे बघण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक हे लहानांपासून थोरांपर्यंत व्यक्त होण्याचे माध्यम झाले आहे. त्याचा वापर शाळकरी मुलांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा दुष्परिणाम इतका घातक होत आहे, की याचे सामाजिक भानच राहत नाही. लॉकडाऊननंतर अभ्यासासाठी मुलांच्या हातात आलेला मोबाईल हाच त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक कारकिर्दीला घातक ठरू पाहत आहे, अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे सामाजिक भान विसरलो काय, हा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलाने अल्पवयीनच मुलीवर अत्याचार केला. यामध्ये मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मुलावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलगा जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी आहे. त्याचे वय १५ असून तो शिक्षण घेत आहे. तर मुलगी ही साडेतेरा वर्षांची आहे. तीही जिल्ह्यातील रहिवासी आहे.
संबंधित मुलाने गोड बोलून मुलीवर अत्याचार केले. यामध्ये अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. यानंतर मुलीच्या नातेवाइकांकडून मुलाच्या विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुल्ला हे तपास करीत आहेत.