पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे कारला ट्रकची जोरात धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, त्यांचे डॉक्टर पती हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत ट्रक चालकावर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७) असे मृत झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांचे पती डॉक्टर मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पवन भगवान साठे या ट्रक चालकावर या अपघाताप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिक्रापूर येथील खैरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मच्छिंद्र खैरे आणि डॉ. सोनाली खैरे हे दोघे आज १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या एम एच १२ एच एन ३६५३ या कारमधून पुणे नगर महामार्गावरील साई सहारा पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरुन परत येत असताना रस्ता ओलांडत असताना पुण्याच्या दिशेने येत असताना अहमदनगरच्या बाजूने वेगाने आलेल्या एम एच १२ क्यू जी ७४४७ या ट्रकची खैरे यांच्या कारला जोरदार धडक बसली.
धडकेत कारचा पुढचा भाग पूर्णपणे आत गेला. त्यात डॉ. सोनाली या बसलेल्या बाजूने ट्रकची धडक बसली होती. त्यामुळे डॉ. सोनाली या पूर्णपणे दबल्या गेल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाळ करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत डॉ. कैलास बाळासाहेब बांदल यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.