ताज्याघडामोडी

डाळींबाच्या बागेत पिकवला कोटींचा गांजा; पोलिसांनी शेतकऱ्यास घेतले ताब्यात

डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची विक्री करण्यासाठी लागवड आणि जोपासणा करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी १ कोटी ५ लाख ७५ हजार ५०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. अंमली पदार्थांबाबत सातारा जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली. संशयित आरोपी कुंडलिक निवृत्ती खांडेकर (वय ४९, वर्षे रा. लोणार खडकी, ता. माण, जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, लोणार खडकी (ता. माण) गावातील एका व्यक्तीने त्याच्या डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची विक्री करण्यासाठी लागवड केली असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लोणार खडकी (ता.माण, जि.सातारा) गावाच्या हद्दीतील डाळीबांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता त्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.

शेतामध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला गांजा लागवड केलेले शेत कोणाचे आहे, याबाबत विचारणा केली असता त्याने ते शेत त्याच्या स्वतःच्या मालकीचे तसेच लागवड केलेल्या गांजाच्या झाडांची जोपासणा करीत असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी १,३३१ गांजाची झाडे जप्त केली. त्याचे वजन केले असता ते ४२३.०२ किलोग्रॅम इतके भरले. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांची किंमत १ कोटी ०५ लाख ७५ हजार ५०० रुपये इतकी आहे. संशयित आरोपी कुंडलिक निवृत्ती खांडेकर (वय ४९) याने डाळिंबाच्या शेतात लागवड आणि जोपासणा केल्याचं आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *