ताज्याघडामोडी

अनेकदा प्रपोज करूनही तरुणी ऐकेना, प्रतिसाद देईना; तरुणानं घरावर बॉम्ब फेकला; पण…

जगभरात व्हॅलेंटाईन डेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे गुलाबी वातावरण आहे. हृदयी वसंत फुलल्यानं प्रेमाचा बहर आला आहे. मात्र प्रत्येकाचा व्हॅलेंटाईन डे गुलाबी नसतो. तमिळनाडूतील मदुराईत याचाच प्रत्यय देणारी घटना घडली. मदुराईतील एका घरावर मोलोटोव कॉकटेल फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला.

अनुप्पनदीमधील वडिवेल रस्त्याशेजारी ४५ वर्षांचे सरवन कुमार राहतात. त्यांच्या घरावर काल दुपारी दोन तरुणांनी मोलोटोव कॉकटेल फेकले. मोलोटोव कॉकटेल बॉम्बला देशी बॉम्ब असंही म्हटलं जातं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली. मणीरत्नम आणि पार्थसारथी अशी दोघांची नावं आहेत. दोघे एकमेकांचे मित्र आहेत. घरावर बॉम्ब फेकल्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी, वित्तहानी झाली नाही.

मणीरत्नम काही महिन्यांपासून सरवन कुमार यांच्या घराजवळ राहत होता. तो सरवन कुमार यांच्या मुलीच्या प्रेमात पडला. मात्र सरवन कुमार यांच्या मुलीला मणीरत्नममध्ये रस नव्हता. माझ्या लेकीला त्रास देऊ नको, असं सरवन कुमार यांनी मणीरत्नमला सांगितलं. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावरदेखील घातला.

काही महिन्यांपूर्वी सरवन कुमार यांनी घर बदललं. ते अन्यत्र राहायला गेले. पोलिसांनी मणीरत्नमला समजावलं होतं. मात्र तरीही तो मुलीचा पिच्छा सोडत नव्हता. मणीरत्नम मुलीला सतत त्रास द्यायचा. तरुणी प्रतिसाद देत नसल्यानं मणीरत्नमनं मित्राच्या साथीनं तिच्या घरावर मोलोटोव कॉकटेल बॉम्ब फेकला.

मोलोटोव कॉकटेल हा एक प्रकारचा देशी बॉम्ब असतो. एका बाटलीत ज्वलनशील द्रव पदार्थ असतात. एक वात असते. ती पेटवून बाटली फेकली जाते. बाटली पडल्यानंतर स्फोट होतो. दुसऱ्या जागतिक युद्धावेळी आणि त्यानंतर व्याचेस्लाव मोलोटोव यांच्या नावावरून या बॉम्बला मोलोटोव कॉकटेल बॉम्ब म्हटलं जाऊ लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *