शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार कल्याण पूर्व भागात घडला आहे. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी त्याब्यात घेतले असून, याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कूटीवर पाठलाग केला होता. संधी मिळताच त्याने एका कोपऱ्यात तिला खेचत नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे आरोपीने पत्रकारांना पाहून ‘व्हिक्टरी’ची खूण करत पोझही दिली.
पीडित विद्यार्थिनीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करुन घेत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोळशेवाडी पोलिसांचा वचक कल्याण पूर्वेत नसल्याने आणि पोलीस गस्त घालत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते. नराधम विशाल याचा माज इतका आहे त्यांनी पोलिसांसमोरच पत्रकारांच्या कॅमेराकडे बघून व्हिक्टरीची साईन दाखवली. याचा फोटो आता समोर आला आहे. त्यामुळे कोळशेवाडी पोलिसांचा धाकच उरला नाही, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.







