एका जाहीर कार्यक्रमात अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याची घटना आसाम येथे घडली आहे. या वेळी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे श्रम मंत्रीही उपस्थित होते. ही घटना शनिवारी तिनसुकिया येथील हॉटेल मिराना येथे आयोजित केलेल्या इंडियन ऑईलच्या एका कार्यक्रमादरम्यान घडली.
या कार्यक्रमात मिथेनॉल मिश्रित एम -15 प्रकारच्या पेट्रोलची माहिती देण्यात येत होती. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी मंचाच्या पाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती.
या पेट्रोलविषयी माहिती देण्यासाठी कंपनीचे एक अधिकारी उभे राहिले आणि माहिती देऊ लागले. त्यावेळी मंचावर केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली आणि आसामचे श्रममंत्री संचय किसान हे देखील उपस्थित होते. अधिकारी माहिती देत असताना पाठीमागच्या स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाला.
व्हिडीओ काही सेकंद स्क्रीनवर दिसत राहिला. हा व्हिडीओ पाहून कार्यक्रमात गोंधळ सुरू झाला. काही वेळातच तो व्हिडीओ बंद केला गेला. मात्र, तोपर्यंत ही घटना काहींनी चित्रीत करून ठेवली. हा कार्यक्रम लाईव्ह अॅप्लिकेशनच्या मदतीने देखील दाखवण्यात येत होता. त्याच अॅप्लिकेशनमध्ये कुणीतरी खोडसाळपणे हा व्हिडीओ सुरू केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रामेश्वर तेली यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.