ताज्याघडामोडी

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गोव्यातील सप्तकोटेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, उदयनराजेंनी मानले आभार

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पणजीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा गोवा सरकारकडून नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर उदयनराजे भोसले यांनी ट्विट करुन गोवा सरकारचे आभार मानले आहेत. पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर १६८८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली, ते गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर जीर्णोद्धारानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होते आहे. त्यासाठी मी गोव्याचे युवा आणि तडफदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतजी यांचे मी मनापासून विशेष आभार मानतो, असे उदयनराजे भोसेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गोवा सरकारच्या पुरातत्त्व विभागाने मंदिराचा जीर्णोद्धार केला.

ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा सरकारचे अभिनंदन केले असून, हे मंदिर तरुणांना आध्यात्मिक परंपरांशी जोडेल आणि राज्यातील पर्यटनाला चालना देईल, असे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले असून, ते पणजीपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर गोवा जिल्ह्यातील नार्वे गावात आहे.

गोवा हे एकेकाळी कदंब राजवटीचा भाग होते. हे राजघराणे शिवभक्त होते. त्यांच्याकडून सप्तकोटेश्वराच्या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, गोव्यातील पोर्तुगीज राजवटीच्या काळात हे मंदिर पाडण्यात आले होते. यानंतर १६८८ मध्ये शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी नार्वे गावातील हे मंदिर पुन्हा बांधले होते. त्यामुळे सप्टकोटेश्वराच्या या मंदिराचे महत्त्व ऐतिहासिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराला जीर्णोद्धाराची प्रतीक्षा होती. भाजप सरकारने २०१९ साली सप्टकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *