ताज्याघडामोडी

नव्या घराचं काम सुरु, पाणी मारत असताना विजेचा धक्का, डॉक्टरांची एक चूक नडली अन् होत्याचं नव्हतं झालं..!

आई, आजी, एक लहान तर एक मोठा भाऊ यांची जबाबदारी पेलणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचं पोलीस किंवा सैन्यात जायचं अन् छोटसं घरकुल बांधायचं स्वप्न अधुरं राहिलं. आता कुटुंबाची जबाबदारी अर्ध्यावर सोडून त्याने जगाचा निरोप घेतलाय. वैद्यकीय क्षेत्रातील ढिसाळपणाचा तो बळी ठरलाय, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी अन् मित्रांनी केलाय. ही घटना औसा तालुक्यातील तांबरवाडी येथील असून मयत तरुणाचे नाव आनंद नीलकंठ भोकरे असे आहे.

पाच वर्षांपूर्वी आनंदचे वडील आजारपणात गेले आणि त्याचे पितृ छत्र हरपले. मोठा भाऊ भोळसर तर घरात दुसरा भाऊ लहान, त्यामुळे आई आणि आजीची जबाबदारी आनंदवर येऊन पडली. शेती फक्त दोन ते अडीच एकर असून कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न आनंदला पडला आणि खांद्यावर पडलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन त्याने शिक्षणासोबतच कपड्याच्या दुकानात नोकरी सुरू केली. “आपण सैन्यात किंवा पोलिसांत जायचं”, असं आनंदचं स्वप्न होतं. त्यासाठी तो कुटुंब, शिक्षण आणि नोकरी करून भरतीची तयारी करायचा.

घर बांधण्याचे स्वप्न तो पूर्ण करण्याच्या मार्गावर होता. घराचा पाया झाला, बांधकाम अर्ध्यावर आलं पण नियतीच्या मनात काही औरच होतं. सायंकाळी मैदानावर शारीरिक कसरत करून आनंदने फुटबॉलचा आनंद घेतला आणि पूर्णत्वाला चाललेल्या घरावर पाणी मारण्यासाठी तो रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी पोहोचला. बोअर सुरू करून पाईपने अर्ध्या बांधलेल्या भिंतीवर पाणी मारू लागला. पण कुठेतरी विजेची वायर कट झाली आणि विजेचा झटका आनंदला बसला.

बाजूला असलेल्या मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वायरची पिन ओढली तोच आनंद भिंतीवर फेकला गेला. मित्र त्याला प्रथम खासगी दवाखान्यात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याला तपासून सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मित्र आणि नातेवाईकांनी आनंदला तात्काळ लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुळे उपस्थित नव्हत्या. त्यांना फोन केला तरीही त्या तब्बल दीड ते दोन तास उशिरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या. दुर्दैवाने तोपर्यंत आनंदने लहान भावाच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी टाकून डॉक्टरांच्या प्रतीक्षेत आपले प्राण सोडले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्व स्वप्न अधुरी ठेऊन त्याला जगाचा निरोप घ्यावा लागल्याचा आरोप नातेवाईक आणि मित्रांनी केला आहे.

जेव्हा डॉ. सुरेखा मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या तेव्हा संतप्त झालेल्या नातेवाइकांवरच भडकल्या. विजेचा धक्का लागलेला मनुष्य जागीच मृत्यू पावतो, असंही त्या म्हणाल्याचे उपस्थितांनी सांगितलं. या प्रकारामुळे नातेवाईक आणि मित्र अधिकच संतप्त झाले. मात्र, काही नागरिकांनी मध्यस्थी केली आणि वातावरण निवळले. डॉ. सुरेखा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आनंदचे नातेवाईक आणि मित्रांनी केली आहे. आनंदचा मृतदेह शवविच्छेदनानंतर सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आनंदवर तांबरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे आनंदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लहान भावावर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *