ताज्याघडामोडी

विनायक मेटे मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मोटे यांच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे. सीआयडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात मृत्यू झाला होता. अतिशय भीषण असा हा अपघात होता. या घटनेनंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तपासानंतर सीआयडने कलम ३०४ (२) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीआयडीकडून या प्रकरणी तपास करण्यात येत होता.

ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघातास्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर, आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आलं होतं.

सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १४० ते १२० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम राइट घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाजूला जागा नव्हती कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आलं होतं, पण तरीही त्याने कार तिथे घातली. आणि त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात हे समोर आलं आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चालक एकनाथ कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता त्याला अटक होणार हे निश्चित आहे. आज किंवा उद्या त्याला पोलीस ताब्यात घेतील. आणि पुढील चौकशीत आणखी काही समोर येतंय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ३०४ (अ) या कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यास त्यामध्ये फक्त दोन वर्षांपर्यंत शिक्षा होते. पण सीआयडीकडून ३०४ (२) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याला मोठी शिक्षा होऊ शकते. कारण अशा प्रकारे कार चालवून अपघात होऊ शकतो आणि यामुळे कारमधील सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्याने वेगात कार चालवली आणि नंतर अपघात झाला. यामुळेच मेटेंचा चालक एकनाथ कदमविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल आणि पुढील चौकशी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *