ताज्याघडामोडी

महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचंय पुरुष, याचिका करत हायकोर्टात धाव

लिंग बदलासाठी मुंबई हायकोर्टात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला कुठलाही दिलासा मिळाला नाही. आधी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कडे दाद मागावी, अशी सूचना हायकोर्टाने महिला पोलिसाला केली आहे.

नांदेडची महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा उर्फ विजय पवार (वय ३६ ) यांनी मुंबई हायकोर्टात लिंग बदलासाठी याचिका केली आहे. आपल्याला शस्त्रक्रिया करून पुरुष व्हायचं आहे. यासाठी एक महिन्याची रजा हवी आहे. या लिंग बदल शस्त्रक्रियेचा खर्चही राज्य सरकारने करावा, अशी मागणी महिला पोलीस नाईक वर्षा पवार यांनी केली आहे. पवार यांच्या याचिका १ फेब्रुवारीला सुनावणी झाली.

वडिलांच्या निधनानंतर पवार या एप्रिल २००५ मध्ये अनुकंपा तत्वार पोलिसात भरती झाल्या होत्या. मे २०१२ मध्ये त्या पोलीस नाईक झाल्या. ‘आपण आपल्या बहिणीसारखी एक स्त्री म्हणून दिसत असलो तरी मनात कायमच पुरुषी भावना येत होत्या’, असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. डिसेंबर २०१८ मध्ये केलेल्या चाचणीत आपण पुरुष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सेंट जॉर्ज हॉस्पिटलनेही चाचणीचे रिपोर्ट बरोबर असल्याचं म्हटलं आहे. तसंच लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

एप्रिल २०२१ मध्ये दिल्लीतील हॉस्पिटलनेही त्या मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं म्हटलं आहे. समस्या सोडवण्यासाठी पवार यांनी आपली व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली. पण कुणीही त्यांच्या मागणीची आणि विनंतीची दखल घेतली नाही. यामुळे ऑगस्ट २०२२ मध्ये नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून त्यांनी विनंती केली. यानंतर ७ डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याची नियमात तरतूद नसल्यामुळे मार्गदर्शन करावं, असं त्यांनी पत्रात म्हटलं. त्यानंतर पोलीस महासंचालनालयाने नकार दिल्याचं २ जानेवारी २०२३ ला नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना तोंडी माहिती दिली.

अखेर पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली. वकील एजाज नक्वी यांच्या मार्फत पवार यांनी हायकोर्टात याचिका केली. शारीरिक बदल हा नैसर्गिक आहे आणि मानसिकदृष्ट्या त्या पुरुषी आहेत. यामुळे इच्छेनुसार जीवन जगण्याचा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असं याचिकेत म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *