ताज्याघडामोडी

मित्रांसाठी कर्ज घेतलं, पण त्यांनीच धोका दिला, सावकारानेही छळलं, नको ते करुन बसला…

अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने एका २४ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. अंकुश नंदकिशोर राऊत (वय २४, राहणार लक्ष्मी नगर, मोठी उमरी, अकोला) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर अकोल्यातील दुसऱ्या घटनेत २८ वर्षीय तरुणाने बहिणीच्या साक्षगंधाच्या दिवशीच आत्महत्या केली. निलेश भगवान बोबटे असं या तरुणाचं नाव आहे. या दोन्ही घटनेत सिव्हिल लाईन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

अंकुश राऊत हा काल दुपारी १ वाजतापासून बेपत्ता होता. घरच्यांसह त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. आज बुधवारी सकाळी सिद्धार्थ नगरातील एका घरात अंकुशचा गळफास घेतलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती सिव्हिल लाईन पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अन् अंकुशचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी म्हणजेच शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला. यादरम्यान अंकुशकडे ‘आई मला माफ कर’ अशा आशयाची चार पानांची सुसाईड नोट आढळून आली. तरीही या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं आहे, हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. किंबहुना त्याची माहिती पोलिसांनी दिलेली नाहीये. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश नंदकिशोर राऊत हा घरात एकुलता एक मुलगा होता. तो मोठ्या उमरी मधीलच दत्त क्लिनिक येथे काम करायचा. अंकुशने त्याच्या मित्रांसाठी मध्यस्थी करून एका महिलेकडून काही हजारांची रक्कम घेतली होती. दहा टक्के व्याजावर ही रक्कम घेण्यात आली होती. मित्र वेळेत कर्जफेड न करू शकल्यामुळे अंकुश त्या रक्कमेचं महिन्याकाठी व्याज भरायचा. तसेच त्याने स्वत:च्या घर कामासाठी एका बँकेकडून कर्जही उचलले होते. त्याचेही हप्ते तो फेडत असायचा.

कधीकाळी अवैध सावकारी व्याजावर घेतलेल्या रक्कमेचा मोबदला म्हणजे हप्ता महिलेला (अवैध सावकारी करणारी महिला) दिला जायचा नाही. त्यामुळे सावकारी महिला सतत अंकुशच्या घरी जाऊन तसेच जिथे तो काम करायचा तिथे जाऊन त्याला अश्लिल शिवीगाळ तसेच मानसिक त्रास द्यायची. याच जाचाला कंटाळून अखेर अंकुशने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचे नातेवाईक सांगतात.

अवैध सावकाराकडून मित्राने घेतलेल्या कर्जाचा अंकुश मध्यस्थी ठरला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करू शकल्यामुळे सावकारी महिलेने अंकुशमागे तगादा लावला होता. काही हजार रुपयांच्या कर्जापोटी लाख रुपयांची मागणी त्याच्याकडे करण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून अंकुशने आत्महत्या केल्याचा संशय आहे. याचाही तपास आता पोलीस करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *