ताज्याघडामोडी

नेहमी बाबा सोडायला जायचे, आज आई गेली; शाळेत जाण्याआधी मायलेकीवर काळाचा घाला

बन्नेरघट्टा इथे सिमेंट-काँक्रीट मिक्सर घेऊन चाललेल्या एका ट्रकचा ताबा सुटल्याने तो एका कारवर उलटला. त्यामुळे कारमधल्या आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला.

ही महिला तिच्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी ट्रकच्या मालकाची ओळख पटवली आहे. पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री कुमार (वय 47) नावाची महिला तिची मुलगी समता कुमार (वय 16) हिला शाळेत सोडायला जात होती.

त्या वेळी झालेल्या अपघातात या दोघींचा मृत्यू झाला. बेल्लारी इथली रहिवासी असलेली मृत महिला गायत्री तिचा पती सुनील कुमार आणि दोन मुलांसह बेंगळुरूतल्या एका अपार्टमेंटमध्ये राहतात. ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली.समताला रोज तिचे वडील शाळेत सोडायला जात असत; मात्र बुधवारी एक मीटिंग असल्याने ते लवकर निघून गेले.

त्यामुळे गायत्री तिच्या मुलीला शाळेत सोडायला चालली होती. मृत महिलेचा पती सुनील कुमार घटनास्थळी पोहोचताच त्यांना शोक अनावर झाला आणि त्यांना रडू कोसळलं. `मला 10 महिन्यांचा एक मुलगा आहे. त्याला मी त्याच्या मावशीच्या घरी सोडलं आहे,` असं सुनील यांनी सांगितलं.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आई आणि मुलीचा मृतदेह कारमध्ये अडकून बसला होता. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चार मोबाइल क्रेन आणि एक अर्थमूव्हिंग वाहन बोलवावं लागलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ट्रकच्या मालकाचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *