शिवसेना पक्षप्रमुखपदासोबत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. याची पोचपावती जनतेनेच दिली आहे. प्रश्नमने 13 राज्यात केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे.
प्रश्नमने आपल्या या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत 13 राज्यांची निवड केली होती. ज्यात बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. या राज्यांत देशातील 67 टक्के लोकसंख्या आहे.
‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, 13 राज्यात मिळून 17 हजार 500 जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता.या सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्याना 1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये 2. कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही 3. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढच्यावेळी हेच मुख्यमंत्री हवेत. असे पर्याय देण्यात आले होते. तसेच यात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत. सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचे आणि त्यांना पुन्हा मत करू असे म्हटले आहे.
प्रश्नमने केलेल्या या सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असून त्यांना 44 टक्के मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत. तसेच लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 60 टक्के लोकांनी मत दिले असून त्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोत असे म्हटले आहेत.