केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केले.आपल्या ८७ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. तसंच, अनेक नव्या घोषणाही करण्यात आल्या. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता देत त्यांच्यासाठी असलेली बचत मर्यादा दुपट्टीने वाढवली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खाते योजनेची मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख करण्यात आली आहे. तसंच, विविध खात्यांसाठी असलेल्या ठेवींचीही व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ज्या अंतर्गत वैयक्तिकपातळीवर ज्येष्ठ नागरिक ९ लाखापर्यंत रक्कम जमा करू शकतात. पूर्वी याची मर्यादा ४.५ लाख होती. तर, जॉईंट अकाऊंटला जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक खातं उघडू शकतात. तसंच, ५५ ते ६० सालापर्यंत निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्याच्या एक महिन्याच्या आत गुंतवणूक करण्याच्या इराद्याने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. तसंच, या योजनेतून ज्येष्ठ नागरिक पती-पत्नींचं जॉईंट अकाऊंटही खोलता येऊ शकेल.