ताज्याघडामोडी

टेन्शन वाढलं! ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार, आता…

एकीकडे शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाल येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखपदाचे नेमके काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

येत्या २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे. तर या संघटनात्मक निवडणुकांसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग ठाकरे गटाच्या या विनंतीवर नेमका कुठला निर्णय देणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

२३ जानेवारी २०१८ मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची निवड झाली होती. ही निवड ५ वर्षांसाठी करण्यात आली होती. आता २३ जानेवारी २०२३ रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे.

खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर शिवसेनेवर दावा सांगताना महत्त्वपूर्ण युक्तिवाद केले आहेत. त्यात शिंदे गटानं थेट उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना म्हटलं की, शिवसेना पक्षाची घटना ही बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली होती. ते हयात असताना उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष हे पद देण्यात आलेलं होतं. परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात आलं. याशिवाय २०१८ साली पक्षातील कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेत अनेक बदल केले. त्यामुळं ठाकरेंचं पक्षप्रमुख हे पदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *