ताज्याघडामोडी

अहवालानंतर गौतम अदानींनी मान उंचावली, जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा केला फेरबदल

हिंडेनबर्गच्या दणक्यातून अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह सावरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर शेअर बाजारात तीन दिवसांच्या मोठ्या तोट्यानंतर मंगळवारी समूहाचे बहुतांश शेअर्स तेजीत व्यवहार करताना दिसले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली असून ते पुन्हा एकदा जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी अदानीची एकूण संपत्ती $९९.६ दशलक्षने वाढून $८४.५ बिलियनवर पोहोचली आहे.

उल्लेखनीय आहे की, हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. तर अमेरिकन रिसर्च कंपनीने गेल्या आठवड्यात, बुधवारी आपल्या अहवालात अदानी समूहावर अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि खात्यातील फसवणुकीचा दावा केला. यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तीन दिवस मोठी घसरण झाली आणि समूहाचे मार्केट कॅप $७५ बिलियनने घटले. मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटारडेपणाचा असून एफपीओला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले.

मंगळवारच्या शेअर बाजाराच्या सत्रात अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या भावात तेजी राहिली. समूहातील १० पैकी ७ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या चिन्हात बंद झाले तर तीन लोअर सर्किटला धडकले. समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचे समभाग ३.३५ टक्क्यांनी वधारले. तर अदानी ट्रान्समिशन ३.७३ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ३.०६ टक्के, अदानी पोर्ट्स २.६७ टक्के, अंबुजा सिमेंट्स ३.५० टक्के, एसीसी लिमिटेड ३.३९ टक्के आणि एनडीटीव्ही १.३५ टक्क्यांनी वाढून बंद झाले. दुसरीकडे, अदानी टोटल गॅस १० टक्के, अदानी विल्मार आणि अदानी पॉवर पाच टक्क्यांची घसरण झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *