ताज्याघडामोडी

बारामतीत अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, असं कारण सांगितलं की ऐकताच पिकला हशा

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. मात्र, नेहमीपेक्षा आज त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केल्याचे दिसून आले. याबाबत माध्यमांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पवार म्हणाले की, ‘मला त्याबद्दल काही माहित नाही. तुम्हीच पोलिसांना विचारा. कदाचित त्यांना वाटलं असेल की (पत्रकाराला गमतीने उद्देशून) तू माझ्यावर काहीतरी हल्ला करणार म्हणून वाढ केली की काय… मला माहित नाही…’ यावर एकच हशा पिकला.

पुढे पवार म्हणाले की, बारामती माझी आहे, मी बारामतीचा आहे. मी बारामतीचा आहे, बारामती माझी आहे. त्यामुळे मी येणार लोकांमध्ये मिसळणार. माझं मी काम करणार. पोलिसांना काही माहिती मिळाली असेल. प्रत्येकाचे संरक्षण करणे ही पोलीस खात्याची जबाबदारी आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडायची, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना माझ्याकडून सावित्रीबाई फुलेंऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला. बोलण्याच्या ओघात ते घडले. परंतु माध्यमांनी त्याचा नको तेवढा गवगवा केला. मी त्यात असा काय गुन्हा केला?, असे काय आकाश पाताळ एक केले ? की दिवसभर तेच दाखविण्यात आले, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला.

बारामतीत जनता दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, वास्तविक मी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक व्हायला नको होती. परंतु ओघात ती झाली. त्याचे मोठे भांडवल करण्यात आले. बोलण्याच्या ओघात या गोष्टी घडतात. मला लक्षात आल्यावर मी लागलीच चूक दुरुस्त करत दिलगिरी व्यक्त केली. आपल्या मराठी संस्कृतीत वडिलधाऱ्यांनी आपल्याला जेथे चूक होते तेथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायची शिकवण दिली असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *