ताज्याघडामोडी

गर्भवती महिलेची विहिरीत उडी, पाण्यात पडताच दिला बाळाला जन्म

चंद्रपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुमठाना गावात एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेनं विहिरीत उडी घेतली. हैराण करणारी बाब म्हणजे पाण्यात उडी घेताच तिने बाळाला जन्म दिला.

यात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

27 वर्षीय निकिता अनेकदा तणावात असायची. कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की तिच्या एका वर्षाच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर तिच्या आठ महिन्यांच्या मुलीनेही अचानकच जगाचा निरोप घेतला होता. या दोन्ही घटनांमुळे तिला मोठा धक्का बसला होता.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती तिसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा तिला सतत या गोष्टीची भीती होती, की या बाळासोबतही काही विपरित घडू नये. याशिवाय गावातील कोणीही तिला भेटायला आलं की आधीच्या मुलांबद्दल बोलायचे आणि तिसऱ्या बाळाबद्दलही चर्चा करायचे. गावातील लोकांचं म्हणणं आहे, की निकिताच्या या अवस्थेमुळे घरातील लोक सतत तिच्या आसपास राहायचे आणि तिची काळजी घ्यायचे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घरातील लोक काहीतरी कामात होते तेव्हा निकिता अचानक घरातून बाहेर गेली. ती गावातील एका विहिरीजवळ गेली आणि तिने विहिरीत उडी घेतली. पोलिसांचं म्हणणं आहे, की घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी लगेचच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *