ताज्याघडामोडी

अंगावर पाणी उडवल्यावरुन वाद, मर्सिडीज चालकाने कार बाईकवर घातली

मर्सिडीज कार मालकाचे चौघा बाईकस्वारांशी भांडण झाले. त्यानंतर कार चालकाने जाणुनबुजून दिलेल्या धडकेत महिलेला प्राण गमवावे लागले. सोमवारी सकाळी हैदराबादच्या रायदुर्गममध्ये ही घटना घडली होती, परंतु मारिया मीर या जखमी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर बुधवारी ही घटना उघडकीस आली.

मारिया मीर, तिचे पती सय्यद सैफुद्दीन जावेद, तिचे दीर आणि एक नातेवाईक असे चौघे जण दोन दुचाकींवरुन जात असताना संबंधित मर्सिडीज कार चालकाशी त्यांचा वाद झाला. वाहत्या सांडपाण्याजवळ त्यांनी आपल्या बाईकचा वेग कमी केला होता, मात्र आलिशान कार त्यांच्या मागून गेली आणि तिने खड्ड्यात साचलेलं गढूळ पाणी चौघांच्या अंगावर उडवलं.

याचा राग आल्याने दोघा दुचाकीस्वारांनी कार चालकाला जाब विचारला, मात्र गाडीचा वेग कमी करण्याऐवजी त्याने बाईकला धडक दिली. यावेळी पत्नी मारियासोबत दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या सैफुद्दीनने गाडीला पळून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने मर्सिडीज त्यांच्या बाईकवर चढवली.

यामध्ये दोन्ही दुचाकीवरील चौघे जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मारिया मीर या जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर बुधवारी ही घटना उघडकीस आली.

सैफुद्दीनच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी कार चालक राजासिम्हा रेड्डी (वय २६ वर्ष) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्युबिली हिल्स येथील रहिवासी असलेल्या रेड्डीवर आधी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र मारियाच्या मृत्यूनंतर कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *