ताज्याघडामोडी

अभिनेत्याकडून शिक्षिकेचं लैंगिक शोषण; इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकी देत उकळले पैसे

मुंबई पोलिसांनी टीव्ही अभिनेता अमित अंतिलविरोधात धमकावणं, लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण मुंबईतल्या एका शिक्षिकेनं मलबार हिल पोलीस ठाण्यात अमितविरोधात तक्रार दाखल केली.

इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेनं केला. पैसे दिले नाही तर मुलाचा जीव घेण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अमित अंतिलने टेलिव्हिजनवरील काही रिॲलिटी शोज आणि क्राइम-शोजमध्ये काम केलं आहे.

तक्रार दाखल करणारी शिक्षिका ही 42 वर्षांची असून अमितने गेल्या वर्षी तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर दोघं नियमितपणे एकमेकांना भेटू लागले. या भेटींदरम्यान अमितने तिच्या नकळत तिचे काही इंटिमेट फोटो काढले.

या फोटोंच्या बदल्यात त्याने आधी 95 हजार रुपये आणि नंतर साडेपाच लाख रुपयांची मागणी केली. तरीसुद्धा त्याने फोटो परत केले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्याने 18 लाख रुपयांची मागणी केली, तेव्हा महिलेनं तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अमितची मागणी पूर्ण केली नाही तर तो माझ्या मुलाचा जीव घेईल, असा आरोप महिलेनं केला. आतापर्यंत तिने अमितला दोन भागांमध्ये पैसे दिले आहेत. आधी तिने 95 हजार आणि त्यानंतर साडेपाच लाख रुपये दिले.

याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून भारतीय दंड संहितेच्या कलम 354-अ (लैंगिक छळ), 506 (धमकावणं), 384 (खंडणी), 504 (धमकावण्याच्या हेतूने अपमान), 417 (फसवणूक) अंतर्गत अमितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *