डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाई फेक प्रकराणाचे समर्थन केले आहे. आणि शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या त्या सैनिकाचे कौतुक करीत एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहेत. आणि जर सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर ती त्यांच्याच तोंडावर पडते. मला वाटते काल, परवा ती थुंकी काळी शाईचा रुपात चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर पडलेली आहे. आणि मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या वतीने समता सैनिक दलाच्या त्या सैनिकाने केलेल्या या कृत्याचा समर्थन करतो. आणि त्याला माझ्याकडून एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करतो. हे काम आम्हाला करायचे होते. पण आम्हाला ती संधी मिळाली नाही. या संधीचे सोने करून दाखवले. त्यामुळे आंबेडकर कुटुंब त्यांचे आभारी आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे आयोजित धम्म संमेलनात बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले आहे.
दुसरीकडे, त्यशोधक विद्यार्थी संघटनेनेही ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. महापुरुषांच्या विरोधात जे कोणी अपशब्द वापरतील किंवा अवमान करतील त्यांच्या अंगावरील कपडे फाडणाऱ्याला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. धुळ्यातील सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यकारणीचे सदस्य राकेश अहिरे यांनी हा इशारा दिला आहे.