गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मित्र बनला शत्रु, फिरवून आणण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बिसरख पोलीस ठाण्याअंतर्गत एका 57 वर्षीय नराधमाने आठ वर्षींच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. घर बदलण्याच्या कामात व्यग्र असल्याने मुलीच्या वडिलांनी विश्वासाने तिला आपल्या मित्राच्या घरी सोडलं होतं. परंतु, विश्वासघात करत त्याने मुलीवर अत्याचार केला.

विश्वासावर जगातील सर्व गोष्टी अवलंबून आहेत,अशी म्हण प्रचलित आहे. पण जवळील व्यक्तीकडून विश्वासघात होतो तेव्हा मोठा धक्का बसतो. असंच काहीसं पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांसोबत घडलं आहे. आरोपीनं उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात इकोव्हिलेज-3 हाऊसिंग सोसायटी परिसरात अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

पीडित मुलीचे वडिल व आरोपी हे दोघे 10 वर्षांपासून चांगले मित्र आहेत. दोघेही इलेक्ट्रिशयनचं काम करतात. दोन्ही कुटुंबांचं आपुलकीचं नातं आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीच्या आई-वडिलांना दुसऱ्या हाऊसिंग सोसायटीत घर बदलायचे होते. या घाईत मुलीकडे लक्ष देणं होणार नाही म्हणून वडिलांनी मुलीला मित्राच्या घरी सोडलं. पण याचा गैरफायदा घेत आरोपीने त्या मुलीवर अत्याचार केला.

वडिलांनी मित्राच्या घरी चिमुकलीला सोडल्यानंतर आरोपी तिला एका शांत जागी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. त्याच दिवशी रात्री आई-वडिल पीडित मुलीला नेण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. तिला घेऊन ते नवीन घरी परतले. चिमुकलीने घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला नाही. परंतु, ती भेदरलेली दिसल्यानं आईने तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली तेव्हा तिने घडलेला घटनाक्रम सांगितला. मुलीची स्थिती पाहता आई-वडिल तिला घेऊन डॉक्टरांकडे उपचारांसाठी घेऊन गेले. तेव्हा मुलीसोबत अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *