ताज्याघडामोडी

रस्त्यातच रुग्णवाहिकेतील डिझेल संपलं; रुग्णाच्या कुटुंबानं धक्का देत हॉस्पिटल गाठलं

राजस्थानच्या बांसवाडात डिझेलमुळे एका रुग्णाचा जीव गेला. रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेनं निघाली असताना वाटेतच डिझेल संपलं. यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला धक्का देऊन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र इंधन पूर्णपणे संपल्यानं रुग्णवाहिका सुरू होऊ शकली नाही. बऱ्याच प्रयत्नांनी रुग्णाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत रुग्णानं जीव सोडला आहे.

बांसवाडात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीची प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी १०८ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. काही वेळानं रुग्णवाहिका आली. रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका निघाली. रुग्णाचे कुटुंबीय त्याच्या सोबत होते. जिल्हा रुग्णालयात जाताना अचानक रुग्णवाहिका थांबली. चालकानं तपासलं असता डिझेल संपल्याचं समजलं. यानंतर रुग्णाच्या सोबत असलेल्यांनी धक्का देण्यास सुरुवात केली. मात्र काहीच होऊ शकलं नाही. या दरम्यान रुग्णाची प्रकृती आणखी बिघडू लागली.

नातेवाईकांनी रुग्णाला कसंबसं जिल्हा रुग्णालयापर्यंत नेलं. मात्र तोपर्यंत रुग्णाचा जीव गेला होता. सरकार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या कुटुंबातील सदस्याचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री पी. एस. खाचरियावास यांनी मात्र वेगळाच सूर आळवला. आमच्या सरकारनं खासगी रुग्णालयात मोफत उपचारांची व्यवस्था केली आहे. रुग्णवाहिकेतील इंधन संपल्यानं रुग्णाचा जीव गेला असल्यास त्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन जबाबदार आहे. त्यात व्यवस्थेचा दोष नाही, असं त्यांनी म्हटलं. मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *