ताज्याघडामोडी

“मैफिल सप्तसुरांची” कार्यक्रमाने जिंकली पंढरपूरकरांची मने

पंढरपूरकरांनी प्रथमच अनुभवला तबला व हार्मोनियम च्या साथीने बहारदार कार्यक्रम

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सव 2022 अंतर्गत दिनांक 02 ऑक्टोबर 2022 रोजी पंढरपूर येथील स्थानिक कलाकार सुशील कुलकर्णी व सहकारी यांनी सादर केलेल्या “मैफिल सप्तसुरांची” या कार्यक्रमाने कला रसिकांची मने जिंकली. सुरुवातीला सदस्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व सर्व कलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यामध्ये आप्पासाहेब चुंबळकर यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मधुबन मे राधिका, हा रुसवा सोड सखे, कशी नशीबाने थट्टा आज मांडली, एक धागा सुखाचा अशी विविध बहारदार गीते सादर केली.
तसेच श्रीकांत कुलकर्णी यांनी झाला महार पंढरीनाथ, आकाशी झेप घे रे पाखरा, तोच चंद्रमा नभात विविध गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सौ. योगिनी ताठे यांनी गर्द सभोवती रान साजणी, झिणी झिणी वाजे विन, अनादी निर्गुण, हृदयी प्रीत जागते इ विविध गीतप्रकार सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. सौ. आदिती परचंडे यांनी विकत घेतला श्याम, मी हाय कोळी, माझी रेणुका माऊली इ गीतप्रकार सादर करून रसिकांची विशेष दाद मिळवली. तसेच नवोदित गायिका प्रियांका क्षीरसागर यांनी माझिया प्रियाला, नववसन धारिणी हे गीतप्रकर सादर केले.
सदरच्या कार्यक्रमाला हार्मोनियम साथ अप्पासाहेब चुंबळकर व तबला साथ सुशील कुलकर्णी यांनी करून कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली. सदरच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ व मोजके निवेदन डॉ. सौ. प्रतिभा देशपांडे यांनी करून कार्यक्रम अधीकच उंचीवर नेऊन ठेवला.
फक्त हार्मोनियम व तबला यांवर विविध प्रकारची गीते उत्कृष्ठ पणे सादर केल्याबद्दल पंढरपूरकर कला रसिकांनी कार्यक्रमाला उस्फुर्त दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *