ताज्याघडामोडी

भविष्यकाळ हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असेल’-उद्योजक सुधीर मुतालिक

स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २२’चे थाटात उदघाटन

 ‘जेंव्हा  मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले तेंव्हा आपला देश हा आर्थिक दिवाळीखोरीच्या गर्तेत होता. आपल्या देशाकडे तर पैसे नव्हतेच आणि जगातील इतर देशही आपल्याला कर्ज देण्यासाठी तयार नव्हते. आज आपण एका आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशामध्ये राहत आहोत. अभियांत्रिकीच्या विविध ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअरच्या उज्वल संधी उपलब्ध आहेत. भारताने संरक्षण दलाशी संबंधित दीडशे वस्तूंच्या आयातीवर बंधने घातली आहेत आणि त्या वस्तू भारतामध्येच उत्पादित करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याच पद्धतीने एकूण १०२ मेडिकल उपकरणे  आयात करण्यावर देखील भारताने बंदी घातली आहे आणि या उपकरणांचे उत्पादन भारतामध्येच करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे आज आपण जे शिक्षण घेत आहात ते मनापासून घ्या आणि आपले भवितव्य उज्वल करा. इंजिनिअरिंग म्हणजे काय हे नीटपणे समजून घ्या. येणारा भविष्यकाळ हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असणार आहे.’ असे प्रतिपादन नाशिक येथील पॉझीटीव्ह मीटरिंग पंप्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक व सीआयआय, महाराष्ट्रचे माजी चेअरमन सुधीर मुतालिक यांनी केले. 
        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त स्वेरीच्या मध्यवर्ती असलेल्या ओपन एम्पी  थिएटरमध्ये आयोजिलेल्या ‘अभियंता दिन’ व ‘ऑलम्पस २ के २२’ या तांत्रिक महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुधीर मुतालिक हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमा पूजनानंतर प्रास्ताविकात ‘ऑलम्पस २ के २२’चे विद्यार्थी अध्यक्ष प्रमोद आवळेकर यांनी ‘ऑलम्पस २ के २२’ या तंत्र महोत्सवाच्या विविध स्पर्धेचे व बक्षिसाचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देवून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना एकूण ३ लाख ७५ हजारांची बक्षिसे वितरीत करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले पुढे ‘अभियंत्यांची नेमकी भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘१५ सप्टेंबर २०११ रोजी स्वेरीने भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरसोबत सामंजस्य करार केला आणि या सामंजस्य कराराला आज ‘अभियंता दिनी’ अकरा वर्षे पूर्ण झाली. या कराराने स्वेरीमध्ये संशोधनाचा पाया घातला गेला. डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे पंधरा कोटी एवढा संशोधन निधी संस्थेस प्राप्त झाला आहे. अलीकडेच केंद्र सरकारच्या ‘निती आयोगा’कडून स्वेरीमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ च्या स्थापनेसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून हे सेंटर स्थापन करण्यासाठी एकूण ३८८ अर्ज आलेले होते. त्यापैकी केवळ आठ अर्ज निवडले गेले आणि त्या आठ मध्ये आपल्या स्वेरी या संस्थेचा समावेश आहे.आज सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस असून त्यांचे कार्य, बुद्धिमत्ता, उत्साह आणि देशासाठी त्यांनी दिलेले योगदान याबद्दल सांगणे गरजेचे नाही. आज या ‘अभियंता दिना’च्या निमित्ताने आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे सुधीर मुतालिक यांच्या कंपनीचा टर्नओव्हर हा १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते एक मेकॅनिकल इंजिनिअर असून आज ते देशात व देशाबाहेरही औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना केवळ कॉम्प्युटर सायन्स या ब्रँचचा विचार न करता कोअर ब्रँचेसचा विचार करावा. जेणेकरून त्यांना भविष्यात नोकरी शिवाय राहण्याची वेळ येणार नाही तसेच ब्रँच बद्दलचा निर्णय हा भावनिक निर्णय असू नये तर तो विचाराअंती घेतलेला निर्णय असावा.’ असे सांगितले. पुढे बोलताना उद्योजक सुधीर मुतालिक यांनी ‘तंत्रशिक्षण आणि  विद्यार्थ्यांचे करिअर’ या विषयांना स्पर्श करून भविष्यात इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील वाटचालीबाबत उत्तम मार्गदर्शन केले. दोन दिवस चालणाऱ्या ‘ऑलम्पस २ के २२’ च्या राष्ट्रीय स्तरावरील तंत्रस्पर्धेत विविध प्रकारचे २१ तांत्रिक इव्हेंटस् असून यासाठी विजेत्यांना  जवळपास एक लाखांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत राज्यातील अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी झाले असून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन केले असून यासाठी विविध समित्या कार्यरत असून सर्वजण परिश्रम घेत आहेत. ‘ऑलम्पस २ के २२’ च्या राष्ट्रीय स्तरावरील तंत्रस्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, समन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी अध्यक्ष प्रमोद आवळेकर, विद्यार्थी सचिव दीपक शिंदे, सहसचिव आयेशा मुजावर, खजिनदार जान्हवी देवडीकर, सहखजिनदार श्रेयस कुलकर्णी, प्रा. सचिन काळे, प्रा.नितिन मोरे, प्रा.सहदेव शिंदे, प्रा.विजय सावंत, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.  यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, विश्वस्त एच.एम.बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, स्वेरीचे माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, मंगळवेढ्यातील बालाजीनगर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. एस. नष्टे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, ‘ऑलम्पस २ के २२’ साठी बाहेरून आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर ‘ऑलम्पस २ के २२’ च्या विद्यार्थिनी उपाध्यक्षा राजनंदिनी पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *